आमचा उत्तम शाळेचा शोध येथे पूर्ण होऊन, एक आदर्श नागरिक घडविण्याचा व उच्च नितीमुल्यांचे  बिज रुजविण्याचा प्रवास इथून सुरु झाला. आपल्या या विद्यालयात मराठी माध्यमातून सहशिक्षण (CO-ED) वातावरणात शिक्षण प्रदान केले जाते. बालवयातच राष्ट्रप्रेम,आपली संस्कृती-परस्परांबाबत जागरुकता व मराठी भाषेचा सन्मान करायला आपोआपच येथे विद्यार्थी शिकतात. असे  येथे वातावरण आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी ह्या  तिन्ही बिंदूंना जोडणाऱ्या समानतेच्या बाजू मनमोकळ्या व सदृढ संवादाने जोडलेल्या आहेत . हयाचा प्रत्यय आम्ही घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडचणी येत आहेत असे शिक्षकांच्या लक्षात आल्यास त्या अडचणी नक्की कशामुळे येत आहेत याचा शोध घेऊन पालकांबरोबर संवाद साधून व एकत्रीत प्रयत्नांमधून त्या अडचणींवर मात केली जाते. 

रुपाली अपन गांधी
रुपाली अपन गांधी

मी वैभव जोशी, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय मध्ये माझी मुलगी कनिष्ठ वर्गात शिकते. आम्हाला मुलीला मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे होते. त्यावेळी गोळवलकर शाळा हा एक चांगला पर्याय आम्हाला मिळाला त्यामुळे आम्ही मुलीला याच शाळेत दाखल केले.  शाळा भारतीय संस्कार मुलांमध्ये रुजविण्याचा खूप छान प्रयत्न करते.  मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा कायम तत्पर असते. सध्या एकविसाव्या युगामध्ये  मुलांना कॉम्पिटिशनच्या युगात तग धरून ठेवण्यासाठी उत्तम असा अभ्यासक्रमही मुलांना दिला जातो .  तिच्यामध्ये होणारे चांगले बदल हे रोज आम्हाला दिसत आहेत.  त्यामुळे एक पालक म्हणून मला त्याचे समाधान आहे. त्यासाठी गोळवलकर गुरुजी शाळेच्या सर्व शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापिका अपर्णाताई यांचे खूप धन्यवाद ! 

वैभव जोशी
वैभव जोशी

हिरण्याचा म्हणजे माझ्या मुलीचा छोट्या गटापासून ते आत्ता 9वी पर्यंतचा आमचा पालक म्हणून अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखा, अत्यंत समाधानी आहे आणि आनंदी आहे. काही विशेष आदर्श अनुभव असे आले ज्यामध्ये सर्व विश्वस्त, सर्व स्टाफ आणि आदरणीय सर्व शिक्षकवृंद यांचा माझ्यावरील पालक म्हणून विश्वास मी अनुभवला. पालक म्हणून मी आणि माझी पत्नी हा अनुभव कधी विसरू नाही शकणार. पालकांवर संपूर्ण विश्वास असणे हे फक्त पालकांच्या वर्तनावरून नाही तर विद्यार्थ्यांच्या वर्तनावरून ही विद्यार्थ्यांच्या गुणांवरून ही तपासले जाते हा अनुभव मी स्वतः चांगलाच घेतला. आज एका वर्षाच्यावेगळ्या अनुभवातून माझी मुलगी सुद्धा ते सर्वकाही विसरून पुन्हा जेंव्हा अभ्यासाला लागली तेंव्हा तिच्या मनातील शाळा पुन्हा तिला लाभली ह्या तिच्या समाधानी चेहऱ्याने आम्ही पालक म्हणून अधिक समाधानी झालो. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळेतील माझ्या मुलीचे पहिले पाऊल हे आदरणीय श्रीमती धालेवडिकर ताईंच्या काळातले. त्यानंतर आदरणीय सौ.मंजुषा ताई आणि आता आदरणीय श्री. प्रसाद लागू सर व आदरणीय सौ. वासंती ताई बनकर. एकूणच सर्वच मुख्याध्यापकांचा, सर्व शिक्षकांचा एक आदर्श आणि प्रदीर्घ अनुभव मी व माझ्या पत्नीने आमच्या मुलीमुळे घेतला. अजूनही घेत आहोत. कधी विसरू नाही शकणार इतके प्रेम, इतका विश्वास, आदर आणि आधार सुद्धा मला पालक म्हणून गोळवलकर शाळेने वेळोवेळी दिला. संस्कृतीने परिपूर्ण अशा आदर्श शाळा आज टिकवणे हे मी माझे सामाजिक कर्तव्य समजतो. शाळेच्या पुढील सर्व प्रकारच्या उपक्रमामध्ये पूर्ण सहभागी व्ह्यायल अधिक प्रमाणात आवडेल या निमित्ताने ही इच्छा व्यक्त करतो. येणाऱ्या पिढीसाठी ही शाळा एक संस्कारक्षम विद्यापीठ आहे. माझ्या मुलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मला माझ्या पत्नीला एवढच नाही तर माझ्या सर्वच मित्र मैत्रीणीना सुद्धा  शाळे विषयी, सर्व शिक्षकांविषयी  अत्यंतिक आदर, अभिमान आणि समाधान वाटते. 

जीवन धर्माधिकारी
जीवन धर्माधिकारी

मराठी माध्यमातील शाळा कशा असाव्यात याचे उत्तम आणि आदर्शवत उदाहरण म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी वि‌द्यालय. आजकाल वाढत असलेल्या इंग्रजी शाळांच्या बरोबरीने स्पर्धा करणारी पण मुलांच्या शिक्षणाबरोबरच ती मुले आपल्या भारत देशाचे सुजाण, सुसंस्कृत सजग आणि कर्तव्यदक्ष नागरिक कसे होतील यासाठी अथक परिश्रम घेणारी शाळा म्हणजेच मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय.

अगदी खेळगटापासून ते इयत्ता दहावीपर्यंत आणि दहावीनंतर सुद्‌धा आपण शाळेसाठी काहीही करण्यासाठी असलेली तत्परता, त्यासाठी घ्यावे लागणारे अपार कष्ट आणि त्या कष्टातून मिळालेल्या यशाचा स्वीकार स्वतः न करता प्रथम शाळा, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलेले श्रेय आणि ते सांगताना येणारे आनंदाश्रु सुद्धा शाळेसाठी समर्पित करणारे वि‌द्यार्थी शाळा घडवत आहे.

खेळगटापासूनच शिक्षणाबरोबरच विदयार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण हेरुन त्यांना योग्य वेळी संधी देवून त्यांच्याकडून योग्य तेच पण उत्तमोत्तम काम कसे होईल याकडे लक्ष देणारे प्रेमळ पण प्रसंगी कठोर होणारे  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि या सगळ्यांचे भक्कम आधार म्हणजेच आजच्या भाषेत BACK BONE म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक.कोणत्याही अडचणींना धीराने कसे सामोरे जायचे याचे उत्तम उदाहरण शाळेनेच कोरोना काळात दिले. सर्व जग थांबलेले असताना स्वतःच्या जीवापेक्षा मुलांचे शिक्षण कसे होईल, मुलांमध्ये असलेली शिक्षणाची गोडी कमी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देवून प्रसंगी वेळोवेळी शिक्षकांनी प्रशिक्षण घेवून मुलांना शाळेच्या व स्वतःच्या संपर्कात ठेवले. हे करत असतानाच विदयार्थ्यांना संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल) आणि त्यातले विविध कार्यक्रम कसे वापरावे आणि त्याचा सुयोग्य वापर कसा करावा याचा वस्तुपाठच विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा आजच्या भाषेत टेक्नोसॅव्ही म्हणजेच तंत्रज्ञान जाणकार झाला. या शाळेने आजवर अनेक वि‌द्यार्थ्यांना घडविले आणि घडविले आहे. तसेच आम्हा पालकांना देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून शाळा ही नुसतीच शाळा नसून  एक कुटुंब आहे याचा प्रत्यय दिला आणि देत आहे.

हे सर्व लिहिताना ऊर अभिमानाने भरून आला आहे. आणि आमचा पाल्य हा मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकतो हे सांगताना शाळा व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याप्रती नतमस्तक होतो.

अजून खूप लिहावयाचे आहे पण शब्दच अपुरे आहेत.म्हणून....

एक कविता  

ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा ! संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा !!

व्यक्तिमत्त्व विकासाचं वेगळं वळण म्हणजे शाळा !

मौज मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा !! 

कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा !

रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा !! 

 एक ठोका, दोन ठोके तर टणटण वाजणारी घंटा म्हणजे शाळा !

मैत्री आणि भांडणाची जोड म्हणजे शाळा !! 

सकाळची प्रार्थना आणि दुपारचा शेवटचा तास म्हणजे शाळा !

पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा !! 

प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा ! 

शिक्षकाच्या हातातील छडी म्हणजे शाळा !!  

उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा !

उरात साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे शाळा !! 

आयुष्याच्या वळणावळणावर गोड़ स्वप्न म्हणजे शाळा ! 

अशी माझी शाळा, अशी माझी शाळा !!

 

उदय आपटे
उदय आपटे

नमस्कार माझं नाव ओमकार जोशी. शाळेचा पूर्व प्राथमिक विभागाचा मी एक पालक आहे. सर्वप्रथम मला शाळेबद्दल सांगावसं वाटतं की सर्व शिक्षिका मुख्याध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी मुलांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात, त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन त्यांचा रोजचा दिनक्रम कसा पुढे जाईल याची काळजी घेतात. शाळेमध्ये सादर होणारे सर्व सण, उत्सव यांचे शाळेत मुलांना  महत्त्व सांगून ते साजरे केले जातात. त्यामुळे मुलांना  ह्या रूढी परंपरा का साजऱ्या करायच्या याची माहिती मिळते.  शाळेत होणारे कार्यक्रम स्नेहसंमेलन, परिपाठ यांच्यामध्ये गाण्यांची जी निवड केली जाते यातून तसेच श्लोक ,गाणी यांच्यातून मुलांना संस्कारक्षम आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते. शिक्षक आणि पालक यांचा मिळून एक  संघ स्थापन केला जातो . तसेच पालकांसाठी ही विविध उपक्रम आयोजित केले जातात . मुलांना शाळेत खाऊ सुद्धा दिला जातो जसं की नारळी भात पोहे वगैरे . मराठी सोबतच शाळेमध्ये बोली संस्कृत शिकवली जाते , त्यामुळे मुलांचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी खूप चांगली मदत होते. मुलांसाठी श्लोक, समूहगीत, पपेट शो यासारखे उपक्रमही घेतले जातात. आणि पालकांसाठी दिवाळी स्टॉल आजी-आजोबा मेळावा यासारखे कार्यक्रम शाळेमध्ये होतात.  सर्व वर्गांमध्ये भिंतीवरचे जे रेखाटन आहे ते सुद्धा मुलांना आकर्षित करणारे आहे.  यामधून मुलांना चांगले संस्कार नक्कीच मिळतात. 

ओमकार जोशी
ओमकार जोशी