भारताचे ‘रतन’
Posted on April 30, 2025
सौ दीप्ती यादव
आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, त्यातले काही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा कायमचा ठसा समाजावर उमटून जातात. या भारतभूमीत अनेक रत्ने होऊन गेली, त्यातीलच एक म्हणजे यशस्वी उद्योगपती श्री. रतन नवल टाटा. यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे पारशी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच अनेक अडचणींवर मात करत एकट्याने चालले तर खूप मोठे यश प्राप्त करता येते हे त्यांनी दाखवून दिले.त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले पण ते आवश्यकच असतात,कारण ईसीजीची सरळ रेष सुद्धा व्यक्ती मृत असल्याची घोषणा करते. हे ते कायम म्हणत.
सन 1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमध्ये शॉप फ्लोअरवरील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अप्रेंटिसशिप पूर्ण केली होती.त्यांचा साधेपणा, शांतपणा, काटेकोर शिस्त, जिद्द आणि अचूक निर्णय क्षमता, मेहनती स्वभाव यासारख्या अनेक असंख्य गुणांमुळे जे. आर. डी. टाटा यांनी टाटा उद्योग समूहाची जबाबदारी सांभाळण्यासाठी रतन टाटा यांची निवड केली.
25 मार्च 1991 ला टाटा समूहाचे चेअरमन श्री रतन टाटा झाले. जे. आर .डी. टाटा यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देश- विदेशात निरनिराळे उद्योग सुरू करून ते यशस्वी करून दाखवले. आज टाटा समुहाची ‘ग्लोबल बेवरेजस’ जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी ‘कोरस’ ही युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली तर मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंब दुचाकीवर पावसात भिजताना पाहून सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशा नॅनोकारची निर्मिती सुद्धा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
आपल्या देशावरील प्रेमापोटी संपूर्ण भारतीय बनावटीची ‘इंडिका’ही कार 1998 मध्ये त्यांनी बाजारात लॉन्च केली होती.मात्र सुरुवातीला या कारला अपयश आलं आणि त्यांनी ती ‘फोर्ड मोटर‘कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस रतन टाटा डेट्राइटला गेले असताना बिल फोर्डन त्यांना टोमणा मारला की,” जर त्यांनी ‘इंडिका’ विकत घेतली, तर ते भारतीय कंपनीवर उपकार करतील.”त्यामुळे पुढील बोलणी न करताच रतन टाटा व त्यांची टीम नाराज होऊन तिथून निघून गेली. यानंतर एका दशकाने परिस्थिती बदलली. 2008 मध्ये फोर्ड कंपनी आर्थिक संकटात सापडली तेव्हा ,त्यांनी जॅग्वार व लॅड रोवर या ब्रिटिश लक्झरी कार कंपन्या विकत घेऊन भारतीय कंपनीने त्यांच्यावर मोठे उपकार केले हे दाखवून दिले.26 /11 च्या ‘ताज’ हॉटेल वरील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी घेऊन तसेच ‘कोरोना’ संकट आल्यानंतर टाटा कंपनी व टाटा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत त्यांनी देशाला केली होती.
स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्य सेवकांना राहण्यासाठी टाटांच्या लक्झरी हॉटेलचा वापर करण्याची ऑफर सुद्धा त्यांनी दिली होती. असे पाऊल उचलणारे देखील रतन टाटा हे पहिलेच गृहस्थ होते. या कृतीतून त्यांनी माणूस म्हणून समाजाला खूप मोठे योगदान दिले.
“Leadership is not only a position but also it is an action.” हे ते नेहमी म्हणत, ते स्वतः काम करून आपल्या कृत्यातून कर्मचाऱ्यांना दाखवून देत, तसेच उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ते सन्मान सुद्धा करत याचे उदाहरण म्हणजे त्यांच्या सुमोकारचे नाव हे ‘सुमंत मूळगावकर’ यांच्या नावावरूनच ठेवण्यात आले.
माणुसकी सोबतच त्यांचे कुत्र्यांवर सुद्धा प्रचंड प्रेम होते. ताज हॉटेलच्या परिसरात टाटांचे कर्मचारी व वेळ घेऊन भेटायला आलेल्या व्यक्ती यांनाच प्रवेश दिला जातो .पण कुत्र्यांना मात्र प्रवेश कधीही नाकारला जात नाही.आपला कुत्रा आजारी आहे या एकमेव कारणामुळे ‘रॉकफेलर फाउंडेशनचा लाईफ टाईम अचिव्हमेंट’, हा पुरस्कार घेण्यासाठी ते उपस्थित राहिले नाहीत.
टाटा हे फक्त नाव नाही तर तो विश्वास आहे.भारतीय उद्योग विश्वासाचा शिरोमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वातच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठी आदर्श होते. भारत सरकारने सुद्धा त्यांचा ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. ‘न भूतो न भविष्यति’ असे हे महान व्यक्तिमत्त्व 9ऑक्टोबर 2024 रोजी अनंतात विलिन झाले. त्यांच्या या कार्याला व महानतेला सर्वांनीच आदराने नतमस्तक व्हावे.