सोशल मीडियाचा दुष्परिणाम

सोशल मीडियाचा दुष्परिणाम  Posted on July 9, 2025

सौ.मधुरा बापट

‘वसुधैव कुटुम्बकम्।’ हे तत्व मानणाऱ्या भारतीय संस्कृतीने जगाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. पण जग जवळ आले ते इंटरनेटमुळे. इंटरनेटचा वापर हा कितीही प्रगतीसाठी पोषक, उपकारक असला तरी त्याचा अतिरेकी आणि चुकीचा वापर मानवतेला शाप ठरत आहे. 

पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी हात पुढे येण्याऐवजी त्याचा व्हिडिओ तयार करणारे अधिक आहेत. चुकीच्या खोट्या माहितीचा वाऱ्याच्या वेगाने प्रसार होत असल्याने अनेकदा समाजातील शांतता सुरक्षितता प्रश्न गंभीर बनतो आहे. तसेच विशिष्ट समाजासाठी पराकोटीच्या तिरस्काराची भावना निर्माण करणाऱ्या आशयांनी समाजमन घाबरून गेले आहे. किशोरवयीन मुलांना तर या माध्यमांनी भरकटवले आहे. त्यांच्या समस्या कित्येकदा गंभीर स्वरूप धारण करत आहेत. 

सोशल मीडिया किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासामध्ये अडथळा निर्माण करत आहे. नकारात्मक प्रतिक्रिया, सार्वजनिक जीवनामध्ये अपमानास्पद वागणूक दिली जाईल या भीतीने किशोरवयीन मुले अधिकाधिक सोशल मीडियाला बळी पडत आहेत. एकटेपणा, काळजी-चिंता आदर्शपणाचा चेहरा पांघरण्याचे प्रेशर यामुळे मुले निराशेमध्ये डिप्रेशन अडकत आहेत. आपण केलेल्या पोस्टला किती जणांनी लाईक फॉलो करतात, अशासारख्या खोट्या लोकप्रियतेचे बळी होत आहेत. फ्रेंड लिस्ट मध्ये किती फ्रेंड आहेत यावरून खोटी सामाजिक प्रतिष्ठा या मुलांना मोहात पाडत आहे. सोशल मीडियाच्या व्यसनाने इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे जसे की खेळ, अभ्यास यांकडे दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडियावर अनेक मित्र तसेच अनुयायी असलेली ही मुले मात्र प्रत्यक्ष जीवनात एकटेपणा अनुभवतात त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी स्वतःबद्दल नकारात्मक तिची भावना वाढीस लागलेली दिसते. 

व्हाट्सअप युनिव्हर्सिटी तर चुकीच्या बातम्या शहानिशा न करता सर्वत्र पोहोचत आहेतच शिवाय इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट यासारख्या माध्यमांनी व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप ढवळाढवळ सुरू केली आहे. प्रत्यक्ष संवाद तर हरवून चालला आहे या माध्यमाद्वारे तासंतास बोलणारी मुले प्रत्यक्ष भेटल्यावर बोलताना आत्मविश्वास हरवल्यासारखे बोलतात. अनेक शारीरिक त्रासांनी लहान वयातच या मुलांना ग्रासले आहे. सोशल मीडियावरील एखादी नकारात्मक पोस्ट एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये मोठे नुकसान घडवून आणू शकते. 

ओटीपी प्लॅटफॉर्म्स तर किशोरवयीन मुलांना नको त्या वयात, नको त्या प्रकारे, नको ती माहिती पोहोचवतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर नकारात्मक पद्धतीने होतो. जे सत्य सुंदर आहे त्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी दूषित होत आहे. ओटीपी प्लॅटफॉर्म या मुलांना चुकीच्या धाडसासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या वापराने किशोरवयीन मुलांमध्ये निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव आणि attention span म्हणजेच अवधान पातळीची घसरण या समस्या निर्माण होत आहेत.

या मुलांना या व्यसनांपासून दूर ठेवणे हे पालकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. मोठ्यांचा - वडीलधाऱ्यांचा - गुरुजनांचा आदर, लहान मुलांसोबत समजूतीने वागणे तसेच समस्यांच्या भावना व विचारांचा मान ठेवणे या गोष्टी या व्यसनाधीन मुलांना जमत नाहीत. अत्यंत टोकाची भूमिका प्रत्येक बाबतीत घेताना ही मुले दिसतात. संयम, सहिष्णुता, समजूतदारपणा या मूल्यांकडे अशा मुलांना वळवणे आणि ती त्यांच्या रुजवणे आवश्यक बनले आहे.

किशोरवयीन मुलांना या सर्व गोष्टींपासून दूर ठेवायचे असेल तर मला वाटते त्यांच्यामध्ये असलेल्या क्रियाशक्तीला योग्य दिशा दिली पाहिजे. यासाठी मैदानी किंवा बैठे खेळ प्रत्यक्ष मित्रांसह भेटीसाठी प्रत्यक्ष संवाद भटकंती वाचन यासारख्या क्रियांना प्रोत्साहन देऊन या आभासी जगापासून त्यांना लांब ठेवता येईल. 

त्यांना त्यांच्या फावल्या वेळेचा सदुपयोग करायला शिकवले पाहिजे. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या आणि बुद्धिमत्तेला खाद्य घालणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांना गुंतवता आले तर कदाचित या सर्वांपासून ही मुले वाचू शकतील. सर्वांनीच हे लक्षात घेतले पाहिजे, ‘उद्याच्या सुंदर भविष्यासाठी आज सांभाळता आला पाहिजे.’