मंगलयान मोहिम फत्ते

मंगलयान मोहिम फत्ते Posted on July 9, 2025

सौ श्रद्धा साळवेकर

पाच, चार, तीन, दोन, एक ...... आणि झू ऽऽऽम मंगलयान झेपावले अंतराळात.....

तो दिवस होता 5 नोव्हेंबर 2013. आंध्रप्रदेश मधील श्रीहरीकोट्टा येथील 'सतीश धवन स्पेस सेंटर' मधून यान सोडले गेले ते मंगळावर स्वारी करण्यासाठी आणि तब्बल 10 महिन्यांनी म्हणजेच 24 सप्टेंबर 2014 रोजी ते मंग‌ळाच्या कक्षेत स्थिरावले. सगळीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण होते, कारण अंतराळ मोहिमेच्या इतिहासात इस्त्रोने सुवर्णाक्षरांत नोंद करत पहिल्याच प्रयत्नात 'मंगलयान मोहिम फत्ते' केली. यामुळे इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला. 

अनेक वर्षांपासून आपण चंद्रताऱ्यांच्या गोष्टी ऐकतो, गाणी म्हणतो. भारतातील ऋषीमुनींना तर खगोलशास्त्राचे प्रचंड ज्ञान होते. त्यांनी ऋचांच्या, श्लोकांच्या स्वरूपात ग्रह, तारे, त्यांच्यातील अंतरे व इतर अनेक गोष्टी मांडून ठेवल्या आहेतः म्हणजे पूर्वीपासूनच मानवाला अंतराळाबद्दल एक गुढ आकर्षण वाटत आले आहे. या सगळ्या कुतुहलाचाच एक भाग म्हणजे 'मंगळयान प्रक्षेपण' म्हणजेच 'मार्स ऑरबिटरी मिशन' (MOM). 

"अनंत अमुची ध्येयासक्ती
 अनंत अन् आशा किनारा तुला पामराला।" 

असा उत्तुंग ध्येयवाद असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ वैज्ञानिकानी असंभाव्य गोष्ट संभाव्य करून दाखविली. ही घटना म्हणजे भारतीय विज्ञानाच्या क्षेत्रातील एक मैलाचा दगड! यामध्ये वाटा होता तो शास्त्रज्ञांचा, आर. राधाकृष्णन, एम. अण्णादुराई, एस. रामकृष्णन, एस. शिवकुमार, व्ही. आदिमूर्ती एक ना अनेक किती नावे सांगावी! या मोहिमेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे 27% महिला वैज्ञानिक. अनुराधा टी. के., रितु करिधल, नंदिनी हरिनाथ, मीनल संपत, नौमिता दत्ता आणि कितीतरी !! पारंपारिक वेशभूषा केलेल्या या महिला वैज्ञानिक इतकं अचाट आणि चाकोरीबाहेरचं कार्य करतात हे बघून सगळं जग आश्चर्यचकितच झालं. 

PSLV-C35 हे यान आकाशात झेपावले 5 नोव्हेंबर 2013 ला, पण ही तर या मोहिमेची सुरुवात होती. वैज्ञानिकांचा मुख्य हेतू होता, यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणे…ज्यासाठी यानाला पृथ्वीला सहा प्रदक्षिणा घालावयाच्या होत्या आणि मग मंगलयात्रा करायची होती. मंगळाच्या कक्षेत फिरायचे होते पृथ्वीची कक्षा ओलांडल्यानंतर यानाला एक ठराविक गती प्राप्त झाली तरच हे कार्य सफल होणार होतं म्हणजे तीर निशाण्यावर लागणं खूप महत्त्वाचं होतं आणि तीरंदाज व निशाणा यांच्यात अंतर मात्र होतं ते 80,000 किलोमीटरचं! निशाणा अचूक साधला, मंगलयान मोहिम फत्ते झाली !!! 

आता मंगळच का ? तर मंगळावर मिथेन आहे का? खनिजे आहेत का ? त्यायोगे कदाचित तिथे पाणी असून जीवसृष्टीची काही शक्यता आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. ऑगस्ट 2010 पासून MOM ची तयारी करण्यात आली. 2 वर्ष मिशनच्या संभाव्यतेचा अभ्यास केला आणि 2012 साली सरकारी परवानगी घेऊन 15 महिन्यांत तयारी करून यान अंतराळात झेपावले देखील ! खरंच भारताचे राष्ट्रपती (माजी) मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे तसे Excellence is a continuous process and not an accident'  हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले. 

मंगळावरील फोटो घेण्यासाठी ‘मार्स कलर कॅमेरा', तापमान बघण्यासाठी 'थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर, मिथेन वायू आहे का हे बघण्यासाठी ‘मिथेन सेन्सर', हवामान व कक्षेचा अभ्यास करण्यासाठी 'मार्स एक्झोस्पेरिक न्युट्रल कंपोझिशन अनालायझर' व खनिजे त्यांचे प्रमाण तपासण्यासाठी 'लेमॅन अल्फा फोटोमीटर' इ. साधनांचा सामावेश या मंगलयानात होता. आज या मोहिमेला 12 वर्षे पूर्ण झाली. आतापर्यंत यानाने 2 टेराबाईट्सपेक्षा जास्त डेटा दिला आहे. शेकडो फोटो, हवामानाचे विश्लेषण, तेथील लाल माती, धुळीची वादळे आणखी बरीच माहिती आपल्याला मिळाली आहे. 

या मोहिमेचे यश म्हणजे भारताने अवघ्या 120 कोटी रूपयांत मंगळावर स्वारी केली. अमेरिकने जे यान सोडण्यासाठी 5000 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केले ते यान आपण 8 रूपये प्रति किलोमीटरने मंगळावर पाठविले. ही खूपच कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी !

मंगळयानाच्या या सफलतेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी वैज्ञानिकांना खुप शुभेच्छा दिल्या. ते स्वतः त्यावेळी इस्त्रोच्या बंगळूरूच्या कार्यालयामधून संबोधित करतांना सर्वांना म्हणाले,

'आज मंगळ आणि पृथ्वीचे मिलन झाले, 
मंगलको MOM मिल गयी'
'इरादे मंगल, काम मंगल,
तो मंगलयात्रा भी सफलही होगी ना।' 

या मोहिमेची अनेक वैशिष्ट्ये आहेत, आशिया खंडातील पहिला देश ज्याने मंगळावर यशस्वी स्वारी केली, जगातील केवळ चौथा देश. याआधी नासा, रॉसकॉस्मॉस, युरोपियन स्पेस एजन्सीन मंगळावर पोहोचल्या होत्या पण पहिल्या प्रयत्नात फत्ते करणारे जगात आपण एकमेव...हीच तर आहे 'MOM ची जादू’ !!!! आपणा सर्व भारतीयांसाठी मंगळांची ही यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे: