कळसूबाई
Posted on April 21, 2025
सौ . राजश्री औटी
इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकवताना कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर असून त्याची उंची १६४६ मीटर आहे हे बऱ्याच वेळा सांगितले होते. ते पाहण्याची सुप्त इच्छा मनात होती. ती संधी ४ मार्च २०२४ ला आली.सह्याद्री ग्रुपवर ट्रेकची माहिती आल्यानंतर लगेच पैसे भरून माझा सहभाग नोंदवला.१७५ उत्साही ट्रेकर्स, चार बसेस मध्ये बसून ३ तारखेला रात्री ११ वाजता पुण्याहून निघालो. पहाटे साडेपाच वाजता बारी गावी पोहोचलो.
कळसूबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आहे. ६ वाजता चढायला सुरुवात केली. हवेत गारवा होता. पाठीवर चार लिटर पाणी, फळे, नाश्ता असा पाच ते सहा किलोचा बोजा होता. समोर डोंगरावर दिसणाऱ्या दिव्यांच्या रांगेप्रमाणे चढायचे असे सांगण्यात आले. सुट्टीचा वार असल्याने चढणाऱ्यांची गर्दी होती तर काहीजण रात्री शिखरावर मुक्काम करून उतरत होते. थोडे वर गेल्यावर चहा प्यायला थांबलो, तोच सूर्यनारायणाने दर्शन दिले. त्याने मुक्तहस्ते केलेल्या रंगांची उधळण सर्वजण कॅमेऱ्यात कैद करून पाहत होते.वाटेमध्ये लागणाऱ्या अवघड शिड्या, माकडांचा होणारा त्रास, वरून येणाऱ्या लोकांना वाट करून देत कशाबशा पार केल्या. बाजूच्या खाण्याच्या दुकानांमध्ये मॅगी,भजीचा वास येत होता. सकाळी ८.३० वाजता समोर शेवटची शिडी व वरती कळसूबाईचे छोटे देऊळ,भगवा फडकताना दिसला.त्याला पाहून थोडे हायसे वाटले.
शेवटचा टप्पा पार करायला उत्साहाने निघाले.घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे व धुक्यामुळे शेवटची शिडी चढताना थोडा त्रास झाला. वर गेल्यावर मात्र हिमालयात आल्यासारखे वाटले.महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर पोहोचल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. कळसूबाईचे दर्शन घेतले. ध्वजापुढे नतमस्तक झाले. शिखरावरून दिसणारा निसर्ग डोळे भरून पाहून घेतला. मनसोक्त छायाचित्रे काढली. थंडीमुळे खूप वेळ थांबणे शक्य नव्हते, त्यामुळे लगेच खाली उतरायला सुरुवात केली. शिडी उतरून सर्वांनी शिदोरी सोडून नाष्टा केला.भंडारदरा धरणाचा जलाशय, सह्याद्रीच्या डोंगरांगा न्याहाळत सावधगिरीने उतरायला सुरुवात केली. दुपारी१२ वाजता बारी गावी पोहोचलो. ग्रुपमधील गणेश दादांनी शाही पुलाव केला होता. त्याचा आस्वाद घेतला. तृप्तीचा ढेकर देऊन बसमध्ये बसलो. गाडी सुरू होताच आपोआप डोळे मिटले. ट्रेकच्या सुखद आठवणी बरोबर घेऊन पुण्यात पोहोचलो.