नवरात्रातील नवदुर्गा अवतारांच्या पूजनाचे महत्त्व
Posted on April 21, 2025
सौ. शर्मिला आनंद कुलकर्णी
ब्रम्हांडाची जी उत्पत्ती झाली त्यामागे जी शक्ती आहे तिला आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री रूपाने पूजले जाते. नवरात्रातील दुर्गादेवीच्या रूपांना स्त्री मधील विविध रूपांत दर्शविले जाते.
दुर्गा देवीचे जे प्रथम रूप आहे जे 'शैलपुत्री ' म्हणून ओळखले जाते. या नावाचा अर्थ 'पर्वताची मुलगी'! म्हणजे यात देवीचे रूप लहान मुली सारखे आहे. ज्याप्रमाणे लहान मुले आपल्या आई - वडिलांच्या नावाने ओळखले जातात, त्याप्रमाणे या रूपात देवीला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. या रूपात देवीला दोन हात आहेत. एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते. म्हणजेच मुलांमध्ये जसे अनेक संभाव्य गुण असतात त्याप्रमाणे देवी मध्ये कमळाप्रमाणे सौम्यता आहे आणि त्रिशूल चालवण्याची ताकद देखील आहे.
देवीचे द्वितीय रूप म्हणजे ' ब्रह्मचारिणी '. पूर्वीच्या काळी जेव्हा विद्यार्थी गुरुकुलात शिकायला जात असत त्यावेळी ब्रह्माचर्याचे पालन करून त्याग आणि तपस्या करावी लागत असे. पुढील आयुष्यासाठी योग्य ते शिक्षण घेण्याचे हे वय आहे.
देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपामध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून तिने हातात माळ आणि कमंडलू घेतलेले दिसते. हे रूप एखाद्या तपस्विनीचे आहे. याची तुलना एखाद्या विद्यार्थी रूपाशी होऊ शकते. या वयात विद्यार्थ्यांनी एखादी तपस्या केल्याप्रमाणे आपले शिक्षण घ्यायचे असते.
देवीचे तिसरे रूप म्हणजे 'चंद्रघंटा'. हे देवीचे दशभुजा असलेले रूप आहे , तसेच यामध्ये तिचा तिसरा नेत्र देखील दाखवला जातो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी तयार असतात. शिक्षणामुळे त्यांना एक वेगळी दृष्टी प्राप्त झालेली असते.
देवीचा चतुर्थ अवतार म्हणजे 'कुष्मांडा'. कू म्हणजे छोटे ,उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंडस्वरूप. यात देवीचे अनेक हात व एक मडके देखील दाखवले जाते. असे म्हणतात की जेव्हा काही नव्हते त्या वेळेला ब्रम्हांडाची निर्मिती देवीने याच अवतारातून केली होती. त्यामुळे या अवताराची तुलना आपण एखाद्या गर्भवती स्त्रीशी करू शकतो. जसे मातेने ब्रम्हांडाला रचले त्याप्रमाणे एखादी गर्भवती स्त्री नवीन जीवाची निर्मिती करू शकते.
देवीचा पंचम अवतार म्हणजेच 'स्कंदमाता'. जी देवी शैलपुत्री होती ती आता स्कंदमाता झालेली आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय. देवीच्या या रूपात कोणतेही शस्त्र नाही. देवीच्या हातात कार्तिकेय आणि कमळ दाखवले आहे. देवीच्या या रूपात ममतामय स्वरूप दिसून येते. वात्सल्यतेने भरलेल्या मातेच्या रूपाशी आपण देवीच्या या रूपाची तुलना करू शकतो.
देवीचा षष्ठ अवतार 'कात्यायनी' अवतार आहे. या अवतारातच देवीने महिषासुराचा वध केला होता. या अवतारात देवीला अठरा भुजा प्राप्त होतात. हा देवीचा शक्ती स्वरूप अवतार आहे. ज्याप्रमाणे आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी आई सर्व शक्तींनी युक्त होते. बाळाला सांभाळून एका वेळेला ती अनेक गोष्टी करू शकते. बाळासाठी कितीही कठोर होऊ शकते. त्याचे रक्षण करू शकते. आई झाल्यावर स्त्री मध्ये जी शक्ती निर्माण होते त्याचे स्वरूप आपण या अवतारात पाहू शकतो.
देवीचा सप्त अवतार 'कालरात्री'. देवीचे हे सर्वांत विक्राळ रूप आहे. या रौद्ररूपात देवीने रक्तबीजाचा वध केलेला दिसून येतो. याचा अर्थ असा की जी स्त्री आपल्या ममतेने एखाद्या नवजात शिशूची निर्मिती करू शकते, तिथे ती धर्माच्या स्थापनेसाठी रौद्ररूप देखील धारण करू शकते.
देवीचा अष्टमावतार आहे ‘महागौर’. या अवतारात देवी परिपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. हे देवीचे अत्यंत शांत आणि सुंदर, परिपूर्ण रूप आहे. देवी जेव्हा कौटुंबिक रूपात महादेव, कार्तिकेय व गणेश यांच्यासोबत असते तेव्हा ती आपल्याला गौरी या रूपातच दिसते. या रूपात एका स्त्रीचे आपल्या कुटुंबाप्रती उन्नती आणि सुख यांचे कर्तव्य दिसून येते.
देवीचा नवम अवतार सिद्धीदात्री. देवीच्या या अवताराची तुलना आपण स्त्रीच्या अशा रूपाशी करू शकतो ज्या रुपात एखाद्या स्त्रीला जीवनातील सगळे अनुभव आलेले आहेत आणि या अनुभवांचा उपयोग करून ती आपल्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करू शकते. जसे की आपल्या घरातील वृद्ध स्त्रिया आपल्याला मार्गदर्शन करतात.
देवीला या रूपात ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान झालेले आहे. आता देवी आपल्या भक्तांनी तिला काही मागितले तरी ती सर्व काही करण्यास समर्थ आहे. जसे घरातील आजी आपल्या नातवंडांसाठी सर्व काही करण्यास समर्थ असते.
अशाप्रकारे आपण स्त्री जीवनातील विविध पायऱ्यांची तुलना देवीच्या नऊ रूपांशी करू शकतो.
॥ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ||