संगीत एक साधना शिकवण्याची....
Posted on April 21, 2025
प्राजक्ता बेंद्रे (पूर्व प्राथमिक विभाग)
संगीत शब्द आला तरी आपण सुखावतो.. असेच काहीसे होते जेव्हा एखादा शिक्षक संगीत गोष्टीच्या, गाण्याच्या, कवितेच्या ओळीमधून शिकवत असतो. मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांना सोप्या भाषेतून, संगीतातून मिळणारे वेगळे आनंद, त्यांच्या रोजच्या शालेय जीवनात वेगळी सुखानुभुती देऊन जातात. ह्याचा प्रत्यय संगीत शिकवणाऱ्या प्रत्येकाला सारखा वाटेल. शिकवण्याच्या कलेमध्ये मुलांना किती आणि कसा आनंद आपण देऊ शकतो ह्याबद्दल शिक्षकांचा विचार सुयोग्य असा झलेला असतो आणि जेव्हा प्रत्यक्ष मुले तो आनंद घेताना दिसतात त्यावेळी आपला विचार योग्यच होता याचे समाधान शब्दातीत मिळत असते. संगीताच्या सातच स्वरांना घेऊन आपले गाणे प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे गात असतात, तरीही प्रत्येकाचा आनंद हा तितकाच वेगळा पण प्रभावी असतो. लहान मुलांना गीतांची गोडी, बडबड गीत, बालभावगीत, अभिनय गीत इत्यादी सारख्या प्रकारातून लागत असते. शास्त्रीय संगीत शिकण्याच्या पूर्व स्थितीत ह्या मुलांना ऐकण्याची सवय लागते ज्याचा उपयोग मोठे होतांना जाणवतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना संगीतातून छोट्या छोट्या गीतांमधून आवड निर्माण करणे, संगीताची तोंड ओळख होणे, लयबद्ध कृती करण्याची सवय लावणे, इत्यादी हेतू यामध्ये असतात. गाणे म्हणताना टाळी देऊन ताल देत गायले तर ते पटकन लक्षात राहते पाठ होते, मुलांचं शब्द संग्रहात भर पडत जाते. ज्याचा उपयोग मुलांना इतर अभ्यास शिकण्यातं होताना दिसतो, यातील महत्त्वाचे असे की पालकांनी ही आपल्या पाल्याचे असे निरीक्षण करत राहणे आवश्यक वाटते ह्यातून आनंदी मन आनंदी शिक्षण ह्या उक्तीचा प्रत्यत नेहमी येतान दिसेल. आपापल्या मुलांसाठी गीतांमधून अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हेतू साधताना दिसू लागतील. एखाद्या प्राण्याचे, पक्ष्यांचे गाणे, पावसाचे गाणे या सारख्या छोट्या छोट्यागीतांची आवड मुलांना लवकर लागते. तेच ते गीत पुन्हा पुन्हा म्हणून घ्यावे असा आग्रह हि मुले करतात त्यावेळी आपण शिकवलेल्या संगीताच्या विविध पद्धती प्रत्यक्ष कृतीत चपखल बसलेल्या दिसतात. जसे कृती करून त्यावर गीत म्हणणे, छोट्या छोट्या आवडीच्या अॅक्शन करत करत मुले गात असतात हे सर्व मुलांसाठी अधिक परिणामकारी होत असते. या आणि अशा अनेक गोष्टी संगीत शिक्षकांना शिकवण्याबरोबरच समाधानाची अमूल्य भेट देत असतात. बालवाडीतील अभ्यासाचा गाभाच गाणी-गोष्टी-खेळ असला तरी तोही अनेक वर्ष अनेक प्रयोग होत होत.. आणि मुख्यत्वे मूळ बुद्धिमंतांचा विचार करूनच आखून घेतल्या आहेत. मुलांमधील मोठेपणी बदल होताना दिसल्यावर लक्षात येते की, बालवाडीत मुल जाते तेव्हा ते त्याच्या प्रगतीच्या दिशेने कमी कालावधीतच अधिक परिणामकारी शिक्षण घेत असते.